आनंदाचे झाड .....

🍁मनातल्या मनातले 🍁

माणसाने आनंदी कसं रहावं या बद्दलच्या निरनिराळ्या पोस्टस्  वारंवार वाचायला मिळतात. बरेच उपाय  सुचवले असतात . मला प्रश्न पडतो या उपायांनी खरंच निर्भेळ आनंद मिळतो का ? आनंद दुकानातून आणायची तयार वस्तू आहे की काय? 
 आनंद मनात असावा लागतो. प्रत्येक गोष्ट आनंदानी स्वीकारण्याची प्रवृत्ती असावी लागते. 
आमच्या  बाजूच्या संकुलात नव्याने एक चौकीदार आला होता. सतत हसण्याचे गाण्याचे आवाज यायचे .  कुतुहल वाटून मी एकदा डोकावले. दोघही पतीपत्नी हसतमुख, मी चौकशी केल्याचा आनंद चेहऱ्यावरुन ओसंडून जात होता. " मुलाच्या उपचारासाठी आलो जी."
 बघते तो मोठा मुलगा अपंग हात पाय लुळे (quadriplegia) डोकेही एका बाजूला कललेले  पण चेहऱ्यावर हसू मात्र कायम. 
 त्या छोट्याच्या निष्पाप हसण्याने  मला काय वाटले ते शब्दात नाही सांगता येत. 
 दुसरा मुलगा  चुणचुणीत. त्याला २-४ पुस्तके दिली . मला वाटले बघेल चित्र तरी. तो दुसऱ्या  दिवसा पासून ABCD आणि Nursery  Rhymes चे आवाज यायला लागले. "अरेव्वा ! कोणी शिकवलं लगेच? " तो त्याची आई म्हणाली "  मॕट्रीक आहे काकू मी. " 
 parking  lot मध्ये संसार मांडलेला, गावात नवीन म्हणून काम मिळायची मारामार,  अपंग मुलगा , ज्याच्यात कधीच सुधारणा होऊ शकणार नाही  हे माहिती असूनही सदैव आनंदात राहणाऱ्या  या जोडप्याकडून फार मोठा धडा मिळाला मला. 
 आपल्याला सतत रडण्याची सवयच झाली असते की काय? हातात असलेल्या सुखाचे क्षण ओळखताच येत नाही? आभासी किंवा न मिळालेल्या सुखाच्या मागे लागता लागता आयुष्यातले छोटे छोटे आनंदाचे क्षण निसटून जाताहेत याचा विचार  कधी करणार ? आयुष्यात सगळच काही मिळत नाही पण जे मिळालं आहे ते किती मोलाचं आहे याची जाणीवही नसावी कां ? 
 लहानपणा पासून
  " सुख पाहता जवापाडे दुःख पर्वता एवढे "
   हेच ऐकत सतत आलो आणि संसार हा नुसता दुःखानीच भरलेला आहे असे समजून सुस्कारे सोडत आलो. 
  दुःखाचे  पर्वत ओलांडतांना विसावा देणाऱ्या अनुभवांची दखलच नाही घेतली? वाटेत उमलेली दृष्टी सुख देणारी, आपल्या सुगंधाने दिलासा देणारी चिमुकली फुलं दुर्लक्षित कशी राहिली?   विचार करतांना सुखाचे क्षण आठवू लागले तो काय खजिनाच सापडला की मला
 आजीss म्हणून बिलगणारी नातवंड,  आवर्जून  भेटायला येणारे विद्यार्थी , कित्येक  वर्षांनी भेटलेल्या मित्र मैत्रीणी .मुलांना मिळालेले यश.यादी लांबतच जाईल. हे तर मोठे प्रसंग पण साधी  आवडत्या गाण्याची कानावर पडलेली लकेर, झाडावर  उमलणारी कळी ,सुद्धा आनंद देते, सृजनाचा आनंद काही आगळाच असतो. 
 मी कामाला बुटीबोरीला जायची रस्त्याच्या दुतर्फा असलेले बहरलेले गुलमोहर आणि आमलतास सुखावून जायचे आज ही त्याच्या आठवणीनी मन सुखावून जातं . शोधला तर अशा अनेक गोष्टीत आनंद मिळतो. 
 सुधा मूर्तींच्या पुस्तकातली गोष्ट आठवते आहे. 
 दोन भावांना जड गाठोडे देऊन भले मोठे वाळवंट पार करायला सांगितले जाते. एक चालून  चालून दमल्यावर गाठोड्यातले ओझे  हलकं करण्यासाठी त्यातली चीज हळूहळू  फेकून द्यायला सुरवात करतो शेवटी रिकाम्या हाताने पल्ला गाठतो. 
 दुसरा मात्र सावकाश का होईना ओझे पेलत नेटाने मुक्कामावर पोहचतो. पोहचल्यावर गाठोडे उघडून बघतो तर काय त्यात मोठाले हिरे असतात जे दुसऱ्या  भावाने दगड समजून फेकून दिले होते.
आपलं सगळ्यांचं असंच तर नाही होत? अनमोल अनुभवांकडे बघण्याचा दृष्टिकोन  तर चुकीचा नाही?  असे लहान मोठे आनंदाच्या क्षणांचे गाठोडे घेऊन वाटचाल करणेच केव्हाही श्रेयस्कर नाही का? अशा आनंदाचे पारडे दुःखापेक्षा केव्हाही जडच असेल.
 माझ्या माहितीत बरेच जण असे आहेत जे आपल्या दुःखाचा किंवा फजितीचा प्रसंग हसत हसत वर्णन करतात.त्यातही आनंदाचा अनुभव घेणारे महाभाग  थोरच म्हणायचे! 
  शं.ना.नव-यांची "आनंदाचे झाड" ही कादांबरी आठवते. सगळ्या उणीवांवर मात करणारा आशावाद ठेऊन सुखाची कल्पना करत आनंदात रहाणं जमायला हवं.  
  जे पुढ्यात आलं ते भोगणं तर भाग आहे पण त्यातून स्वतः आनंद घेणं आणि देणं किती कठीण ! हे ज्यांना जमलं त्यांना आयुष्याचा खरा अर्थ कळला .
 सगळ्यांच्याच अंगणात असे आनंदाचे झाड असावे.
 " चित्ती असू द्यावे समाधान" हेच खरे.
    
    @ सौ.अमृता खोलकुटे

Comments

Popular posts from this blog

"कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन*"

*विश्व पर्यावरण