*विश्व पर्यावरण

🍂   *मनातल्या मनातले* 🍂

४ जून २०२०

*विश्व पर्यावरण* 

वसुंधरा विधात्याने निर्माण केलेलं सुंदर  स्वप्न .
हे वसुंधरे ! 
अनमोल रत्नांची खाण तू आम्हाला दिली. हिरव्या रंगाचा शेला ओढलेलं तुझं रुप सगळ्यांना मोहून टाकणारं आहे . फुलांनी बहरलेली , फळांनी लगडलेली , शेतांनी लहरलेली वसुंधरा म्हणजे आपल्या लेकरांच्या भरण पोषणा साठी सज्ज असलेली  माताच आहे.   युगानुयुगे एकाच कक्षात  स्वतः भोवती फिरत राहून तेजाचा ,  प्रकाशाचा स्त्रोत मानवाला उपब्ध करुन दिलास. 
सृष्टीचा समतोल राखण्यासाठी,  वातावरणाचे संतुलन राखण्यासाठी ,  मानवाच्या कल्याणासाठी  पशुपक्षी  ,जीवजंतू निर्माण केलेस . त्यांच्या सुरक्षेची तजवीज केलीस . पर्यावरणाचे कवच दिलेस. 
माते  !  आपल्या अपत्यांना कशाचीही उणीव भासू नये म्हणून किती काळजी घेतेस तू ? शितल वायू, निर्मळ जल, वनांनी , खनिजांनी समृद्ध असलेल्या वसुंधरेनी मुक्त हस्तानी आपली संपत्ती मानवावर उधळली. आणि आम्ही काय केलं गं ?  तुला ओरबाडलं , प्रदूषित केलं ,  रसायनांच्या भरमार वापराने तुझ्या मातीचा कस नाहीसा केला , वनं नष्ट केली . दुर्मिळ गुणकारी वनस्पतींचा नाश केला. आमच्या रसनेचे चोचले पुरवण्यासाठी पशुपक्ष्यांच्या जीवावर उठलो. जैवविविधता नष्ट केली. तुला नामशेष करण्याच्या स्थितित आणून सोडलं 

वसुंधरे !  तू पण स्त्रीच आहेस म्हणून तुला असे अत्याचार सहन करावे लागताहेत कां  गं ?  पण शेवटी स्त्री शक्तीचा परिचय तू देतेसच . अत्याचार सहन न झाल्याने चवताळून उठलेली स्त्री सुद्धा  रौद्र रुप धारण करते. तशीच तू कोपलीस का गं मानवावर  ?   घाण्याला जुंपल्याप्रमाणे एकसारखे फिरत राहण्याचे नाकारुन कड बदलते आहेस का तू ? 

सतत येणारी वादळं , भू स्खलन, धरणीकंप तुझं रौद्र रुप दाखवून देतात. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीनी जगापुढे अनेक समस्या निर्माण करतेस . आईनी पाठ फिरवल्यावर लेकरु सैरभैर होतं तशी आमची अवस्था झाली आहे. 

आता तर कोरोनाच्या रुपानी मानवानीच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला मग तू तरी क्षमा कशी करणार ? प्रलय असाच असतो का गं ?   का ही प्रलयाची सुरुवात आहे ? या प्रलयातून वाचणार का कोणी ?  तुला शुद्ध करण्याची, पूर्वीचे स्वरुप आणण्याची ही तुझीच योजना आहे का ? 

कोरोनाचे संकट आल्यावर तू दिलेल्या औषधी वनस्पतींची आम्हाला आठवण आली . तुझ्या अनमोल देणगीला एरवी आम्ही मोडीतच टाकून दिलं होतं. 
 आता पर्यावरण थोड्याप्रमाणात का होईना पूर्वीचं रुप धारण करायला लागलं आहे.   पुन्हा स्वच्छ निळे दिसणारे आकाश , पक्ष्यांची किलबिल, व निर्धास्तपणे विहरणारे पशुपक्षी ,  दूरवरुन होणारे हिमालयाचे दर्शन आम्ही तुझ्यावर किती अत्याचार केले होते याची साक्ष  देतात. कबूल आहे संहाराच्या खुणा तुझ्यावर कायम रहाणारच आहेत. त्या मानवाला त्याच्या चुकांची जाणीव सतत करुन देणारच  ! 
हे वसुंधरे !  अशी कोपू नकोस. तूच रागवलीस तर लेकरांनी जायचं कुठे ? 
आई आपल्या मुलांचे कान धरुन शिक्षा करुन त्यांना वठणीवर आणते . तशीच सुबुद्धी आम्हाला दे. पण तुझ्या कृपेची छाया आम्हावर सतत राहू दे. या पुढे पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. 
हे वसुंधरे   ! तुला शत शत प्रणाम. 

 *सौ .अमृता खोलकुटे* .©

Comments

Popular posts from this blog

"कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन*"

आनंदाचे झाड .....