ओवाळते भाऊराया............

🍁मनातल्या मनातले 🍁
8Nov'2018

   ओवाळते भाऊराया............

पूर्वी घरोघरी रेडिओवर भाऊबिजेच्या दिवशी हे गाणे वाजत  असायचे .किती सुरेख आहे भावाबहिणीचं हे नातं!भाऊबहीण म्हणजे एकमेकांचे friend ,guide ,philosopher सगळे काही. वेळप्रसंगी विविध भूमिका निभावण्याची ताकद या नात्यात आहे.
   एक कथा आठवते. बहुदा य.गो. जोशींची असावी. बहिणीच्या घरी भाऊबीजेसाठी गेलेल्या भावाला बहीण काय ओवाळणी आणली हे उत्सुकतेने विचारते. खिशात दमडीही नसलेला भाऊ ओशाळा होतो आणि हाताला लागलेली सुपारी तबकात घालतो. कालांतराने भावाची परिस्थिती सुधारल्यावर भाऊबीजेसाठी मोठी ओवाळणी घेऊन गेलेल्या भावाला बहीणीने ओवाळणीतली सुपारी जिवापाड जपून ठेवल्याचे दिसते. मन हेलावून टाकणारी कथा होती ती.
     या उलट शुक्रवारची कहाणीही अनेक बहिणींच्या वाट्याला येते.
   देण्याघेण्यावर कां बहीण भावाचे प्रेम अवलंबून असते ? ते कायम स्वरुपी असतेच.
 अलिकडे नात्यात कोरडेपणा यायला लागला की काय? केवळ सोपस्कार उरले ? रीत म्हणून प्रसंग पार पाडायचा. इतर नातेसंबंधांची ओढ जास्त.
  नात्यांच्या विस्ताराने परीघाचे केंद्रबिंदू पासून दूर जाणे स्वाभाविक असले तरी आपले अस्तित्व केंद्राभोवतीच आहे याचा परीघाने  विसर पडू देऊ नये.
  मुळात सर्व मोत्यांना माळेत बांधून ठेवणारा आईचा धागा हरपला की मोतीही विखुरतात .अगदी घरंगळत जातात.
पुन्हा त्याची माळ गुंफता येईल कां?त्यासाठी मायेचे पाश ( कोणत्या?)प्रबळ असावे लागतात.
  दूर असलेल्या भावाच्या दीर्घायुसाठी , कल्याणासाठी प्रार्थना करत बहीण चंद्राला ओवाळते"चंदा जा रे जा " म्हणत भावाला निरोप पोहचवण्याची गळ घालते, तिला माहित असते भाऊ जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी चंद्र त्याच्या जवळ पोहचणारच. चंद्राला बघून भावांना येत असेल कां  बहिणीची आठवण ?
बीजेचा चंद्र अगदी थोड्याच वेळासाठी दिसतो. आजकाल तर उंचच उंच
मनो-यांमुळे झाकला जातो .ओवाळणीचे तबक घेऊन बहीण बीजेची प्रतिक्षा करत असते. चंद्र दर्शनाचा क्षण जी साधेल ती भाग्यवानच म्हणायची.तिच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होणार. "वेड्या बहिणीची वेडी माया" भाऊराया पर्यंत नक्कीच पोहचणार.

 सौ. अमृता खोलकुटे

Comments

Popular posts from this blog

"कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन*"

*विश्व पर्यावरण

आनंदाचे झाड .....