गाणी भुलाबाईची

गाणी भुलाबाईची
1Nov'2018

 भुलाबाई हा लोकगीत महोत्सव . त्या काळच्या कौटुंबिक ,सामाजिक परिस्थितीचे ,सासुरवासाचे वर्णन करणारी गीते.
   लहानपणी अर्थ न कळता गाणी म्हणत गेलो. सासरचा खाष्टपणा आणि माहेरची माया,ओढ  आधोरेखित होत होती . आता एकेक्या गाण्यातून त्याचा अर्थ उलगडत जातो. सासुरवाशिणीची सुखं -दुःख जाणवतात.
  चिंचा खात रंगणारी भुलाई तळ्यात घागर बुडली तरी तिला त्याचा पत्ता नाही. आजकालच्या काळात चिंचा खाणं आणि पाणी भरायला तळ्यावर जाणं कालबाह्य झालं असलं तरी आपल्यापैकी अनेकींनी अनुभवलं असेल .
ही गाणी गातांना त्या आठवणींना उजाळा नाही का मिळत?
    राळा घेऊन बाजारात गेली आणि मधल्या बोटाला विंचू चावल्यावर वैद्याला बोलवायची धावपळ आणि माहेरच्या वैद्यासाठी धरलेला हट्ट . माहेरच्या वैद्यानी फुंकर जरी घातली तरी वेदना शमतील  असा विश्वासच दिसतो.
चिक्कण मातीचे घातलेले जाते ,त्यावर काढलेला रवा,त्याच्या करंज्या सगळच अपूर्वाईचं. आता करंज्या म्हणजे गृहोद्योगातून आणायचा पदार्थ . तो कशाचा करतात हे आजच्या पिढीला माहित असण्याचे कारण नाही.
      रुसून माहेरी जाणारी,कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडणारी आणि भुलोजीच्या लाल चाबकाला घाबरणारी भुलाई गीतातून का होईना आजकालच्या सासवांना सुखावणारी नाही का?
       माहेरुन मूळ आलं म्हणून सर्वांजवळ आर्जव करणारी,त्यासाठी सांगतील ती कामं करणारी, भुलोजीनी "आण फणी घाल वेणी" म्हणून माहेरी जाण्याची परवानगी दिल्यावर हरखून जाणारी भुलाई  आजकालच्या नव-यालासुद्धा धूप न घालणा-या सुनांच्या पार्श्वभूमीवर जवळची वाटेल.
       तिचे डोहाळे पुरवायला आणि बाळंतीण झाल्यावर खारिक-खोब-याच्या गोणी अंगणात लोटून तिची काळजी घ्यायला सगळे तत्पर आहेत. बाळाचं नाव काय ठेवावे ते सुचवताहेत किती सुखावह आहे हे सगळं .आज असं काही घडायची शक्यता नाही हे माहित असतांना कल्पनेत हे सुख घ्यायला काय हरकत आहे ?
     आजकालच्या भुलाया नव-यामुलाचा स्वतंत्र flat आहे की नाही याची खातरजमा केल्याशिवाय लग्नच करत नाहीत त्यामुळे सासर ,माहेर,रुसवे,मनधरणी या गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. पतीपत्नींमध्ये जरी कुरबुर असली तरी घरातल्या इतर सदस्यांचा काही संबंध नाही असे बजावले  जाते.
      आजकाल भुलाईची नवीन गाणी रचण्याचा अट्टहास केला जातो तो कशासाठी? आधुनिक जीवनशैली तर जगतोच आहोत आपण मग गाण्यात का होईना जुन्याचाच आठव उजागर केला तर बिघडलं कुठे ?
          मुळात या वयात भुलाबाई मांडतो ते बालपणीची गंमत पुन्हा अनुभवावी म्हणूनच ना?जुन्या गाण्यांनी मन तर सुखावतच पण लोकगीतांचा हा वारसा पुढे चालवला जातो. तेव्हा  सख्यांनो जुनं ते सोनं 👍🏻👍🏻
      सुरु करा
      एक लिंबू 🍋 झेलू बाई ................
      आपे दू ssssध तापे त्यावर पिवळी साय................

 सौ. अमृता खोलकुटे

Comments

Popular posts from this blog

"कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन*"

*विश्व पर्यावरण

आनंदाचे झाड .....