नवेवर्ष

🍁मनातल्या मनातले 🍁

       

बघता बघता वर्ष संपले. नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष झाला. सुट्ट्या संपल्या पुन्हा नेहमीची कामं सुरु झाली असतील. नववर्षाच्या जल्लोषातून बाहेर आलात की नाही?
खरं म्हणजे मनुष्य कोणताही बदल सहजा सहजी स्विकारायला तयार होत नाही . मग  नववर्षातला बदल एवढ्या उत्साहाने कसा काय स्विकारतो हे एक कोडेच आहे. याला  आशावाद म्हणायचा की
  " मोर नाचे लांडोर नाचे " 
असा अनुकरणाचा प्रकार ? 
" हम भी कुछ कम नहीं "
दाखवणारा?
नवीन वर्षाची कितीही उत्सुकता असली तरी मन मात्र मागेच रेंगाळतं आहे.  अनुभवाच्या आठवणी झाल्यात .त्या आंबट- गोड आठवणींमधे मन रमतय. लहानपणी मजा वाटायची, मोठं व्हायची घाई होती नं!आता मात्र कॕलेंडरचे पान घट्ट पकडून रहावसं वाटतय. आयुष्याचं एकेक पान कमी होतय याची जाणीव होतेय. पण थांबून कसं चालणार ?
                " थांबला  तो संपला "
 चालायचच! तसंही आपल्या हातात असतच काय? कॕलेंडरची पानं उलटत जातात ऋतु मागून ऋतु येतात बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्याच्या धडपडीत तो ऋतु कसा संपतो ते कळतसुद्धा नाही.
दर वर्षी नवा संकल्प करुन तो पार पाडणारी थोर माणसं बघितली की त्यांच्या समोर नतमस्तक व्हावसं वाटतं .आम्ही आपले सामान्य असे काय मोठे संकल्प करणार ? केले तरी नेटानी पार पाडायची पंचाईतच !वेळआली की नाना सबबी सुचतात . त्या बाबतीत आम्ही थोरच आहोत.
नवीन वर्षात  सगळं मनासारखं घडावं अशा शुभेच्छा देतांना मनासारखं म्हणजे नक्की कसं  ? हा विचार डोकवतोच. Happy  new year  म्हणताना happiness कशात आहे हे ही ओळखता यायला हवं
फारच निराशाजनक झालं की काय?
छे छे! निराश होऊन कसं चालेल? सूर्य मावळला की पुन्हा उगवतोच . त्याच तेजाने तळपतो.  उगवत्या सूर्या कडून नवीन प्रेरणा घेत पुढची वाटचाल उभारीने सुरु ठेवायची आहे.
आपलं नवीन वर्ष  खरंतर गुढीपाडव्या पासून सुरु होतं पण व्यवहाराच्या सोयीसाठी इंग्रजी कॕलेंडर वापरतो नं मग जगरहाटीसाठी नववर्षाचे स्वागतही करायला हवेच.
तुम्हा सगळ्यांना कॕलेंडर  बदलाच्या शुभेच्छा . काय नवीन संकल्प केला ते नक्की कळवा बरं. बघू तुमच्या कडून काही प्रेरणा मिळते का?
Happy  New Year
@  सौ. अमृता खोलकुटे

Comments

Popular posts from this blog

"कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन*"

*विश्व पर्यावरण

आनंदाचे झाड .....