जागतिक महिला दिन

 जागतिक महिला दिन 👩🏼‍🦰
6Mar2019

८ मार्च जगतिक महिला दिन . आलाच आहे जवळ. कर्तृत्ववान स्त्रियांच्या दैदिप्यमान यशाची पानेच्या पाने लिहली जातील .ठिकठिकाणी  महिला दिनाचे कार्यक्रम साजरे होतील, सत्कार समारंभ होतील , वंचितां साठी काम करणाऱ्या संस्थांच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेतला जाईल. अर्थात हे अभिमानास्पद आहेच आणि त्यांचे कौतुक व्हायलाच हवे यात संशय नाही.
       पण ज्या महिला या कोणत्याच गटात नाहीत त्यांचं काय? त्यांना महिला म्हणून मान सन्मानाचा अधिकारच नाही की काय?
समाजातील मध्यम वर्गातल्या कितीतरी स्त्रिया
" रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग"
अशा परिस्थितीत लढत असतात .
    ना त्यांची दखल घेतली जाते , ना कौतुक .
तुम्हाला वाटेल काय नवल त्यात हे तर नेहमीचच आहे. नेहमीचं असलं म्हणून सोडूनच द्यायचे की काय?
       मला त्या स्त्रियांबद्दल म्हणायचे आहे ज्यांची मुलं ना कशातही चमकली, ना शिक्षण धड , ना काही हुनर. नोकरी शोधता शोधता वयं निघून गेली, कमी दर्जाची कामं कशी करणार? लोक काय म्हणतील? असे म्हणत रिकामी राहिलेली म्हणून वाईट मार्गाला लागलेली.काय वाटत असेल त्यांच्या आयांना? कोणत्या आईला आपले मूल वाईट मार्गाकडे वळावे असे वाटेल? त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न नसेल केला तिने? पण सगळ्याचे खापर मात्र तिच्याच माथ्यावर!
       कितीतरी महिला नाकर्त्या नव-याचे संसार ओढत असतात.  मुलांसाठी आयुष्यभर तडजोड करत राहतात.
 एखादीनी बंडखोरी केली की शांती आणि समझोत्याचे  उपदेश करणारी गँग सज्ज झालीच म्हणून समजा.
        मी कितीतरी कुटुंब बघितली शहरात आणि ग्रामीण भागात सुद्धा दोघेही पतीपत्नी चांगली नोकरी करणारे जे हवे ते मुलांना द्यायला तयार असणारे पण मुलं शिकायलाच तयार नाहीत. शेवटी दोष आईचाच.
        औद्योगीकरणात जमिनी गेल्या पैसा भरपूर मिळाला. पण त्याच्यावर बायकांचा  काही हक्क नाहीच. पैसा आला तसा गेला. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडल्यावर प्रतिष्ठित  घरातील स्त्रियांना चार घरची कामं करण्यावाचून तरणोपाय नव्हता. कुणी समजून घ्यायच्या त्यांच्या व्यथा?
     special child असणाऱ्या  आयांची तर आणखीन वेगळीच गोष्ट. असे मूल असणे म्हणजे जणू सर्वस्वी तिचाच अपराध! अशावेळी खरंतर घरातल्या सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित असते पण घडते उलटेच. सगळी जबाबदारी एकटीवर येऊन पडते आणि सुरु होते तिची तारेवरची कसरत. आपण म्हणतो पण ग्रामीण भागातली कुटुंब वास्तवाचा स्वीकार लवकर करतात.
कित्येकदा अशा मुलांची जबाबदारी आज्यांवर येऊन पडते.  म्हातारपणातल्या सर्व व्याधी विसरुन अशा नातवासाठी जीव पाखडणा-या आजीला माझा साष्टांग दंडवत.
        मानसिक आघात तर नेहमीचेच. काय म्हणता हे सर्व खालच्या वर्गात घडत असेल? चुकता आहात तुम्ही! प्रतिष्ठेच्या नावाखाली कित्येकींना ही मुस्काटदाबी सहन करावी लागते. आपल्या नातेवाईक , इतर परिचितांना भेटायची सुद्धा चोरी असते. गंमत म्हणजे यातले कितीतरी नवश्रीमंत असतात पण आता ते समाजाच्या  तथाकथित elite class मधे गणल्या जातात नं ? मग ?
शारीरिक अत्याचारांबद्दल काय?
उच्चभ्रू वसाहतीतील महिला सुजलेला , काळानिळा झालेला डोळा लपवण्यासाठी मोठाले गाॕगल घालून मुलांना शाळेच्या बसवर सोडायला आलेल्या बघितल्यात .
काही वर्षांपूर्वी मध्यरात्री गाढ झोपेच्या पहिल्या प्रहरातील नीरव शांततेत एक किंकाळी ऐकू यायची. वाटायचे स्वप्न तर नाही? घरातल्या कोणीच कशी नाही ऐकली? केवळ मलाच ऐकू येते? शोध तरी कसा घ्यायचा? बरीच खटपट करुन माहिती मिळवली तो किंकाळी बंद झाली. मुलगी माहेरी निघून गेल्याचे समजले आणि मीच सुस्कारा सोडला. शिवाय आमच्या घरच्या गोष्टीत दखल देऊ नका हे नक्कीच  ऐकावे लागले असते. घरातूनही लष्करच्या भाक-या भाजायची हौसच आहे असेही ऐकायला मिळाले असतेच.
उच्च शिक्षित घरातले वर आणि वधू.
लग्नात मुलीच्या काकाला मधुमेह असल्याने आधी जेवले यावरुन जावयाचा अपमान झाला म्हणून मुलीचे माहेर तोडले. वडिलांच्यामागे आईने वाढवले, शिकवले . तिच्याकडे बघून , पाठच्या बहिणी लग्नाच्या आहेत याचा विचार करुन बिचारीनी सगळं सहन केलं. या कहाण्या कधी बाहेर येणार?
      समाजाच्या उपेक्षेचे, तिरस्काराचे कटाक्ष त्यांना घायाळ करतात. हळूहळू सगळ्यातून तुटून आपल्याच कोषात  जातात त्या .
 सगळ्याच जणी यावर बंड करुन नाही उठत. त्याची कारणंही अनेक असतात. काही सबळ तर काही पोकळ. सगळ्यां मध्ये एवढे धैर्य असतेच असे नाही.
कधी कोणी या विरुद्ध आवाज उठवलाच तर स्त्री स्वातंत्र्यावर टोमणे मारायला सगळे तयार असतातच.
स्त्री स्वातंत्र्याचे ढोल बडवले जात असतांना अजूनही जखडलेल्या स्त्रियांचा विचार महिलादिना निमित्ताने व्हावा. आपल्या आसपासच्या केवळ यशाच्या कहाण्या नाही तर अपयशाची इथे तिथे पडलेली , दृष्टीआड केलेली बोचकी उघडून त्यांचा धांडोळा घ्यावा.   
           या सगळ्यांसाठी आपण काही करु शकतोच असे नाही . शेवटी काही गोष्टी वैयक्तिकच असतात.  आपल्याला काही करता आलं नाही तरी असे जीवन धीराने जगणाऱ्या  असंख्य महिलांशी सन्मानाने वागायला , दोन शब्द प्रेमाने  बोलायला  काय हरकत आहे ?
आयुष्यभर अशा अनेक पीडा सोसत , तोंडातून चकार शब्द न काढता , वरवर हास्याचा मुखवटा घालून
वावरणा-या माझ्या अनेक भगिनींना महिलादिनाच्या दिवशी मानाचा सलाम. 🙏🏻🙏🏻

@ सौ. अमृता खोलकुटे .

Comments

Popular posts from this blog

"कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन*"

*विश्व पर्यावरण

आनंदाचे झाड .....