नारायण मुरलीधर गुप्ते

 🍁 मनातल्या मनातले 🍁

30Aug2020

 नारायण मुरलीधर गुप्ते 



नाव ऐकलयं ना ?  बरोबर हे आपल्या विदर्भाचे भूषण असलेले कवी -"बी"   ३० आॕगस्ट  हा त्यांचा स्मृतीदिन. 

आपल्या काव्यसंग्रहातून कल्पना वैभवाची प्रचिती देणारे, आपल्या कल्पक, मोहक अर्थपूर्ण शब्दनादातून, वाचकांना भुरळ पाडणारे, गुंगवून टाकणारे, त्याच बरोबर गुढार्थाने विचारप्रवृत्त करणारे कवी "बी " यांचे  " फुलांची ओंजळ, पिकले पान "  हे काव्य संग्रह प्रसिद्ध आहेत. 

त्यातल्याही " बंडवाला, कविवंदन, माझी कन्या आणि चाफा बोलेना  "  या कवितांना अमाप  प्रसिद्धी मिळाली. 

माझी कन्या -- गाई पाण्यावर  काय म्हणूनी आल्या  ......तर आमच्या काळातल्या सगळ्यांची आवडती कविता असावी. शाळेत अभ्यासाला होती. शाळेत  सगळ्या कविता पाठ असायच्या . आवडत्या कवितांचे तर पारायणच व्हायचे." गाईपाण्यावर काय म्हणुनी आल्या "बालपणी त्यातला अर्थ मनाला भिडायचा पण संदर्भासहित अर्थ लिहा या पलिकडे  फारसा विचार केला असेल असे नाही वाटत . नंतर जाणत्या वयात जुन्या  कविता गुणगुणतांना  त्यातला भावार्थ कळून गहिंवरुन यायला लागले  . जितकेवेळा कविता म्हणू तितके वेळा त्यातल्या शब्दांचे सौंदर्य  मनावर गारुड करायला लागले. 


गरीब गाईसारखी आपली मुलगी कशाने रडवेली झाली याचा शोध घेणारा पिता उपमा , उत्प्रेक्षांचा  कसा फुलोरा फुलवतो हे खरोखरच मनाला भावणारे आहे. मात्यापित्याला आपली मुलंप्रिय असतातच पण  " चित्तचोरटी " या विशेषणाने या नात्याला आणिच गहिरेपण दिलयं असं वाटतं .पिता मुलगी रुसण्याची कारणं शोधतोय.

श्रीमंताच्या मुलांनी गरीबांची थट्टा करणं हे नेहमीचच.ती थट्टातर जिव्हारी नाही लागली ? 

 " पंक संपर्के कमल का भिकारी  ? 

 धूलिसंसर्गे रत्न का भिकारी  ? 

  सूत्रसंगे सुमहार का भिकारी ? 

कशी तूही मग मज मुळे भिकारी  ? " 

हे कडवं तर अगदी vimp म्हणून शंभरवेळा खरडलेलं असायचं .खरं ना ? 

गुणवत्ताच महत्वाची नाही का ?  आजही आतिशय प्रतिकूल परिस्थितीतली मुलं चमकतात  तेव्हा गुणवत्तेचच कौतुक  होतं. परिस्थितीनी  तेज झाकलं जाऊ नये हेच तर सांगायचे आहे नां " बीं" ना ? 

लाट उसळोनी जळी खळे व्हावे 

त्यात चंद्राचे चांदणे पडावे. 

तसे गाली हासता तुझ्या व्हावे 

उसळोनी लावण्य वर वहावे 

गालावरच्या खळीमुळे लेकीच्या सौंदर्याला नव्हे लावण्याला अजूनच शोभा आणणाऱ्या  खळीचे काय सुंदर  वर्णन आहे. कल्पनेचा सुंदर आविष्कार !  आजकालच्या so cute ! च्या पार्श्वभूमीवर हे शब्दलावण्य आणखीनच उठाव आणते. 

  सधन घरच्या कन्यका नटून सजून येतात. त्याचे तर वैषम्य वाटत नाही ?  नटण्या सजण्याची आवड स्त्रियांना उपजतच असते आपली लेकही अपवाद नाही हे समजण्याची सहृदयता पित्यात आहे.   पण गौरी सारखी सजण्यापेक्षा तिचे सौंदर्य मोगरी सारखे साधे तरीही आकर्षक आणि धुंद करणाऱ्या  सुगंधासारखे असावे असेच पित्याला वाटते.

आपल्या लेकीची हौस पुरवता येत नसल्याने त्यांच्यातला बाप कासावीस झाला त्याचे वर्णनच करता येण्यासारखे नाही. त्याचा अनुभव घेणारेच जाणोत. असे म्हणतांना नेहमी आईच्या प्रेमाची महती गायली जाते पण बापाच्या हृदयाची कल्पना येणार का कोणाला असा प्रश्नही विचारतात. 

 शेवटी आपल्या नशिबाला बोल लावतांना  गुणी मुलीचे कोड पुरवता येत नसतील तर करंट्यांना अशी रत्न का देतोस ? असा जाब विचारतांना गावाला जातो अशा शब्दांनी हुरळून जाऊन ती बालिका  सगळा रुसवा विसरुन  मी पण येते म्हणूनआपले रेशमी करपाश  पित्या गळ्यात घालते तो हृद्य प्रसंगच डोळ्यापुढे उभा राहून जीव गलबलून येतो.

प्रौढ वयात ही कविता म्हणजे त्रिकालबाधित सत्य असल्याचा साक्षात्कार होतो आजही परिस्थिती फारशी बदलली आहे असे नाही. 

चाफा बोलेना ..... हे तर भावगीताच्या रुपात सादर झाल्याने  अजरामरच झाले आहे. या दोन कविता म्हणजे दोन टोके आहेत. एकीत प्रपंचात , लेकीच्या मायेत गुंतुन  गेलेला हळुवार हृदयाचा पिता  तर दुसरीकडे परमात्म्याची आस लागलेला कवी. 

चाफा बोलेना ही गुढार्थ असलेली कविता.  या कवितेने त्यावेळच्या कवितेच्या सगळ्या चौकटी मोडून टाकलेल्या. याचे वेगवेगळ्या समिक्षकांनी वेगवेगळे  अर्थ लावले. कोणी रुसलेल्या प्रतिभेचा  कवी शोध घेतो असा अर्थ लावला तर कोणी  आध्यात्मिक . 

आज विचार करता आपल्या कथा पुराणातला विचारच मांडलेला नाही वाटत का ?  

चाफा म्हणजे सुगंधी असं आपला आंतरात्मा तो कायम विषयसुखात रमलेला असतो . पण हे शाश्वत सुख नव्हेच. ज्ञानेंद्रियाचे पाच विषय -शब्द , स्पर्श, रुप ,रस , गंध या सगळ्याच्या अनुभवाचेच वर्णन नाही का केले कवितेत ? 

आंब्याच्या वनात  रसस्वादा बरोबरच मैने बरोबर गाणी म्हटली पण ते मंजुळ स्वर मन रिझवू नाही शकले . केतकीचा नागांनाही धुंद करणारा सुगंधही मोह घालत नाही  .गळ्यातगळे घालून , स्पर्शाचा अनुभवही परिणाम नाही करत.झिम्माफुगड्या घालून कर्मेंद्रियेही फार काळ मन रमवू शकत नाहीत. 

हे विश्वाचे आंगण परमेश्वराने दिले आहे मग सीमित गोष्टींमधे आनंद का शोधावा  ?  या सृष्टीचा निर्माता चराचरात भरुन राहिला आहे. वाऱ्यात , ताऱ्यात , फुलापानात , मेघात, अंबरात सर्वत्र  तोच आहे . अंतरात्मा जर  परमात्म्यात लीन झाला   तर परम आनंदाचाच अनुभव येणार . चाफा फुलून येणारच . पण मग कुठला चाफा नि कुठलं काय  ?   जिवाशिवाच्या भेटी नंतर उरतच काय ?  परमात्मा आणि अंतरात्म्याचं व्दैत मुळी उरणारच नाही . 


तरुण वयात केवळ लतादिदी आणि वसंत पवारांच्या संगीताने भारावून गेलेलं मन आता कवितेचा असा अर्थ शोधायला लागलं आहे. खरे काय ते " बी " च जाणे. आचार्य अत्र्यांनी तर  या कवितेला  "प्रेमाचे नितांत सूक्त " असं म्हटलय . " वड्डे लोग वड्डी वड्डी बाते " आम्हा  पामरांना जे उमगलं ते असं.

एकूण काय कवी " बी "  यांंनी  आमच्या विचार मंथनाला  चालना दिली त्यांना शतशः नमन. त्याच्या कवितांनी विचारांची दिशा बदलवून टाकली आणि शब्दसौंदर्याचे रसग्रहण करायला लावले एवढे खरे.

मधमाशांच्या  गुंजारवा वरुन  " Bee "  हे नाव घेऊन सादर  केलेल्या कोमल काव्याचा गुंजारव असाच गुंजत राहो . 


 सौ. अमृता खोलकुटे . ©

Comments

Popular posts from this blog

"कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन*"

*विश्व पर्यावरण

आनंदाचे झाड .....